संस्कार

संस्कार म्हणजे काय ह्याच्या बऱ्याच व्याख्या होतील पण संस्कार म्हणजे काय ह्याचा अर्थ अचानकच माझ्या समोर आला.

मी झाडांना पाणी घालायला गच्चीत गेलो होतो आणि पाणी घालता घालता जास्वदांच्या झाडाजवळ रेंगाळलो, का माहिती नाही पण पहिल्यापासूनच मला साधे लाल जास्वदांचे फूल अतिशय प्रिय आहे … ऐकायला जरा विचित्र वाटेल पण फुलांचा राजा म्हणून गौरवल्या गेलेल्या गुलाबापेक्षाही मला साधे लाल जास्वदांचे फूल अतिशय मोहक वाटते. बघितलं तर जास्वानंदाला छान टपोरी कळी आली होती. साधारणपणे चार एक तासात ती कळी पूर्ण फुलली असती. तेव्हढ्यासाठी परत कुठे वरती येणार म्हणून ती अर्धवट उमललेली कळी तोडून घरी जाऊन पाण्यात ठेवावी म्हणजे ते फूल देवाला वाहता येईल असा साधा सरळ विचार होता… हात पुढे केला आणि अचानकच थांबलो …. स्वतःशीच हसलो अन हात मागे घेतला ….

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे … माझ्या लहानपणीची … मी अंधेरीला माझ्या मामाकडे राहायला गेलो होतो. आमचा निवासमामा म्हणजे “चिंता करितो विश्वाची” ह्याचा आधुनिक अवतार होता. कर्त्तृत्व आणि हळवेपणा ह्यांचं अनोखं मिश्रण मामाच्या व्यक्तिमत्वात होतं…. सकाळी का माहित नाही पण मी जरा लवकरच उठलो होतो. मला वाटतं रविवार असावा आणि मामा सोसायटीच्या मागच्या अंगणात फुले काढायला चालला होता. “मी पण येतो” असं म्हणून मी मामाच्या मागे मागे निघालो. अजून आठवतंय सोसायटीच्या मागच्या अंगणात बऱ्यापैकी फुलझाडे होती आणि आम्ही पूजेसाठी फुले काढत होतो, तेव्हढ्यात मी जास्वदांच्या झाडाजवळ गेलो आणि त्यावरची टपोरलेली कळी काढणार एव्हढ्यात मामा ओरडला “अरे थांब, काय करतोयस … कळी कशाला कढतोयस?” मी नाही म्हटलं तरी जरा वैतागलोच “अरे मामा पण २-४ तासात फुलेल ती कळी… मग आत्ताच काढून घरी पाण्यात ठेवूया … फुलेल की ती ! नाहीतर नंतर कुणी काढून नेली तर आपल्यायाला मिळणार नाही.” मामानं त्यावर जे सांगितलं ते जरी नीट कळलं नाही तरी आत कुठेतरी पटलं. तो म्हणाला “अरे असू दे, आपल्याला नाही मिळाली तरी, पण आपल्या सोयीसाठी कळी कशाला तोडायची? फुलेपर्यंत राहू दे की रे तिला झाडावर …. मग आपल्याला नाही मिळाली तरी चालेल!”….

आज नाही म्हटलं तरी ह्या छोट्याश्या गोष्टीला पस्तीस-एक सहज वर्षं होऊन गेली असतील … दुर्दैवाने आज निवासमामाही ह्या जगात नाही … पण आजही माझा हात आपोपाप मागे आला …. मला वाटतं छोट्याश्या वाटणाऱ्या प्रसंगाची आपल्या मनावर उमटलेली खोल मुद्रा असते तिलाच संस्कार म्हणत असावेत! प्रश्न केवळ जास्वदांच्या कळीचा नाही आहे तर केवळ आपल्या सोयीची आहे म्हणून चुकीची गोष्ट करू नये हा संस्कारच माझ्यासाठी एक देणगी आहे … अर्थात लौकिकार्थानं आपलं नुकसान होऊ शकतं पण एक गोष्ट मी अनुभवाने सांगतो … रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर झोप निवांत लागते – कुणालाही भेटताना आपली नजर कधीही झुकत नाही !!

2 thoughts on “संस्कार

Leave a comment