गप बस बावळटा !

माझं आणि माझ्या आईचं नातं हे कुठल्याही माय-लेकाच्या नात्यासारखं तर आहेच (होतं लिहिण्याची ताकद माझ्यात नाही!) पण वात्सल्याबरोबरच त्याला आणखीही काही मजेशीर कंगोरे आहेत. जीवाभावाचे सोबती जसे एकमेकांना प्रेमाने दणके देतात तसेच काहीसे आम्ही कायम एकमेकांशी वागत आलो. आत्ता सुद्धा “बघ मेल्या – निमिष, विनया , पल्लवीने माझ्याबद्दल किती छान लिहिलंय – तू का झोपा कढतोयस!” असं कुठे तरी ऐकल्याचा मला भास झाला. जे लोकं तिला वर्षानुवर्षे ओळखतायत त्यांना मला नक्की काय म्हणायचंय ते बरोब्बर कळेल!

तसा आमचा दोघांचा मूळ स्वभाव लढाऊ ह्या स्वरूपाचा (अर्थात तिच्या मते तिचा स्वभाव लढाऊ अन माझा आगाऊ!) पिल्लांना जसे मांजरीचे दात लागत नाहीत तसे तिचे बोलणे मला कधीच लागायचे नाही – पण त्यामुळे तिची पंचाईत अशी व्हायची की तिला हवे तसे वागायला (विशेषतः तिच्या पथ्य-पाण्याबद्दल) ती जेव्हा मुक्तपणे सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची त्याचा माझ्यावर परिणाम व्हायचा नाही मग बऱ्याच वेळा चिडून ती मला शेवटी “गप बस बावळटा!” म्हणायची.

आमच्या दोघांचे हे मुक्तछंदातले ठोसे आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यकही होते. लहानपणापासूनच माझ्या स्वतःबद्दल फाजील कल्पना आहेत. मी असा बेबंद हवेत भरकटायला लागलो की कुठे तरी माझ्या पतंगाचे “काय पो छे” व्हायायच्या आत ती मला सुरक्षितपणे खाली आणायची! ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझा अटलजींकडून मेडल घेतानाचा फोटो बघून आमचे एक शेजारी जेव्हा कौतुकाने म्हणाले “भावी पंतप्रधान !” तेव्हा मी लाजलो – तिकडून बाहेर पडल्या पडल्या माझ्या पाठीत दणका घालून ती म्हणाली “मेल्या ते अटलजींबद्दल बोलत होते – तू कशाला लाजलास?” त्या फोटोतला दुसरा माणूस ह्या स्तुतीसाठी माझ्यापेक्षा योग्य आहे ह्याची मला जाणीवही नव्हती आणि तिच्या इतके मला कधीच कुणी ओळखलं नाही !

माझे तिचे वाद हे बहुतांशी तिच्या पथ्य-पाण्यावरून असायचे – ती कुणाचं ऐकत नाही ह्या निष्कर्षावर आल्यावर बहुतेक वेळा मला गुंडासारखी तिच्याशी वाद घालायची सुपारी मिळायची. अतिशय कलात्मक रित्या वेगवेगळ्या प्रकारे काळजाला घरे पडणारे (तिच्या मते) “dialogues” संपले आणि तरीही मी माझा मुद्दा सोडला नाही की आमच्या वादाचं भरतवाक्य ठरलेलं असायचं. पण हा राग फार वेळ टिकायचा नाही आणि दुसऱ्यांसमोर तर कधीच नाही – फक्त एकदा मात्र आमचं भांडण झाल्यावर तिला सांभाळायला आलेल्या ‘आया’ ला माझी ओळख “हा माझा मोठा मुलगा – प्रेमळ आहे पण थोडा उद्धट आहे” अशी करून देण्यात आली होती पण असा प्रसंग विरळा – एरव्ही तिची मुलं (ह्यात सुना जावई पण आले) म्हणजे तिचा अभिमान होता.

तिची ऊठसूट सगळ्यांबद्दल खायला घालण्याची हौस तर सर्वज्ञात आहे आणि त्यातून कुणाचीच सुटका नव्हती. तिच्या मते तिच्यापेक्षा लहान कुणालाही “तुमचं खायचं -प्यायचं वय आहे हे बिनदिक्कतपणे सांगण्याचा तिचा हक्क होता ह्यात तिच्या विहिणी – म्हणजे सुनांच्या आयांची पण सुटका नव्हती – त्यांचही “कौतुक” करायची हुक्की अनावर व्हायची – आणि कौतुकाचा प्रकार एकच – खाउ घालणे – काही महिन्यांपूर्वी मला म्हणाली “पल्लवीच्या आईला माझा साखरभात आवडतो. एकदा माझ्या हाताने करून पोटभर खायला घालणार आहे!” आपण काय बोलतो आहे ह्यातली विसंगती वगैरे तिला कधी दिसायचीच नाही. मी तिला म्हणालो “अगं त्यांची पण सत्तरी आली. त्यांनी नाही खाल्लं तरी चालेल!” – अर्थात ह्या संवादाची सांगता तिच्या नेहेमीच्या वाक्याने झाली! गायत्रीच्या आईबद्दलसुद्धा बोलताना कुणी ऐकलं असतं तर घरातल्या एखाद्या “चुणचुणीत” मुलीबद्दल ती बोलत्ये असं कोणालाही वाटलं असतं !!

तिच्या सुना-नातवंडांपासून ती सगळ्यांचीच “शेंता” होती आणि ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरीही तिची सुना-नातवंडेही तिला त्याच नावाने हाक मारायची. मुक्तपणे बोलणे आणि भांडणे हे तिला आवडायचं – जसे दोन कसलेले गायक एकमेकांच्या गायकीचं कौतुक करतात तसं मला एकदा म्हणाली “तुझ्याशी वाद घालायला (सध्या शब्दात भांडायला !) मजा येते. तू कसा निर्लज्ज आहेस – बाकीचे फारच मनाला लावून घेतात!” ह्यावर हसावं की रडावं (कि नवीन भांडण उकरून काढावं) मला काही कळलं नाही !

आमच्या लुटुपुटुच्या भांडणात कधी कधी ती काळजाला घर पाडून जायची ! हल्ली काही महिन्यापासून नाही म्हटलं तरी ती तिच्या तब्येतीला कंटाळली होती. मग मला बोलता बोलता म्हणाली “बस्स झालं आता माझं” आमच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे अजिबात गंभीर ना होता मी तिला चेष्टेत म्हणालो “नको ग बाई काहीतरी बोलू – मग आम्हाला आई कुठली – बाबांना ह्या वयात दुसरी कुणी मिळणं कठीणच आहे.” ह्यावर खूष होऊन ती खो-खो हसली मग हसणं थांबल्यावर अचानक म्हणाली “अरे असा किती दिवस आईचा हट्ट धरणार तुम्ही लोकं” नशीबानं आमचं बोलणं फोनवर चाललं होतं – त्यामुळे आमच्यातला अलिखित नियम मोडून मला गहिवरून आलं, जाणवलं की तिची इच्छा संपल्यावरही जन्मभर आमचे सगळे हट्ट पुरवून झाल्यावरही केवळ आमच्या हट्टासाठी ती आता जगत होती ! मला काहीच बोलणं सुचलं नाही – कधीतरी वाटतं त्यावर नेहमीसारखं बोलायला हवं होतं काही तरी आचरटासारखं – कदाचित अजून हट्ट पुरवला असता!

तिला शेवटी शरीरानं झेपत नव्हतं म्हणून जिथून तिला कुणीच हलवू शकणार नाही अशा ठिकाणी – आमच्या हृदयात तिने आपला मुक्काम हलवला – मला खात्री आहे – नेहेमीप्रमाणे मी आगावूपणा केला की ती मला तिथूनच म्हणेल “गप बस बावळटा”!!

संस्कार

संस्कार म्हणजे काय ह्याच्या बऱ्याच व्याख्या होतील पण संस्कार म्हणजे काय ह्याचा अर्थ अचानकच माझ्या समोर आला.

मी झाडांना पाणी घालायला गच्चीत गेलो होतो आणि पाणी घालता घालता जास्वदांच्या झाडाजवळ रेंगाळलो, का माहिती नाही पण पहिल्यापासूनच मला साधे लाल जास्वदांचे फूल अतिशय प्रिय आहे … ऐकायला जरा विचित्र वाटेल पण फुलांचा राजा म्हणून गौरवल्या गेलेल्या गुलाबापेक्षाही मला साधे लाल जास्वदांचे फूल अतिशय मोहक वाटते. बघितलं तर जास्वानंदाला छान टपोरी कळी आली होती. साधारणपणे चार एक तासात ती कळी पूर्ण फुलली असती. तेव्हढ्यासाठी परत कुठे वरती येणार म्हणून ती अर्धवट उमललेली कळी तोडून घरी जाऊन पाण्यात ठेवावी म्हणजे ते फूल देवाला वाहता येईल असा साधा सरळ विचार होता… हात पुढे केला आणि अचानकच थांबलो …. स्वतःशीच हसलो अन हात मागे घेतला ….

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे … माझ्या लहानपणीची … मी अंधेरीला माझ्या मामाकडे राहायला गेलो होतो. आमचा निवासमामा म्हणजे “चिंता करितो विश्वाची” ह्याचा आधुनिक अवतार होता. कर्त्तृत्व आणि हळवेपणा ह्यांचं अनोखं मिश्रण मामाच्या व्यक्तिमत्वात होतं…. सकाळी का माहित नाही पण मी जरा लवकरच उठलो होतो. मला वाटतं रविवार असावा आणि मामा सोसायटीच्या मागच्या अंगणात फुले काढायला चालला होता. “मी पण येतो” असं म्हणून मी मामाच्या मागे मागे निघालो. अजून आठवतंय सोसायटीच्या मागच्या अंगणात बऱ्यापैकी फुलझाडे होती आणि आम्ही पूजेसाठी फुले काढत होतो, तेव्हढ्यात मी जास्वदांच्या झाडाजवळ गेलो आणि त्यावरची टपोरलेली कळी काढणार एव्हढ्यात मामा ओरडला “अरे थांब, काय करतोयस … कळी कशाला कढतोयस?” मी नाही म्हटलं तरी जरा वैतागलोच “अरे मामा पण २-४ तासात फुलेल ती कळी… मग आत्ताच काढून घरी पाण्यात ठेवूया … फुलेल की ती ! नाहीतर नंतर कुणी काढून नेली तर आपल्यायाला मिळणार नाही.” मामानं त्यावर जे सांगितलं ते जरी नीट कळलं नाही तरी आत कुठेतरी पटलं. तो म्हणाला “अरे असू दे, आपल्याला नाही मिळाली तरी, पण आपल्या सोयीसाठी कळी कशाला तोडायची? फुलेपर्यंत राहू दे की रे तिला झाडावर …. मग आपल्याला नाही मिळाली तरी चालेल!”….

आज नाही म्हटलं तरी ह्या छोट्याश्या गोष्टीला पस्तीस-एक सहज वर्षं होऊन गेली असतील … दुर्दैवाने आज निवासमामाही ह्या जगात नाही … पण आजही माझा हात आपोपाप मागे आला …. मला वाटतं छोट्याश्या वाटणाऱ्या प्रसंगाची आपल्या मनावर उमटलेली खोल मुद्रा असते तिलाच संस्कार म्हणत असावेत! प्रश्न केवळ जास्वदांच्या कळीचा नाही आहे तर केवळ आपल्या सोयीची आहे म्हणून चुकीची गोष्ट करू नये हा संस्कारच माझ्यासाठी एक देणगी आहे … अर्थात लौकिकार्थानं आपलं नुकसान होऊ शकतं पण एक गोष्ट मी अनुभवाने सांगतो … रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर झोप निवांत लागते – कुणालाही भेटताना आपली नजर कधीही झुकत नाही !!

पु. लं. चा नारायण

काल आई-बाबांना डॉक्टरकडे नेहेमीच्या चेक-अप ला घेऊन चाललो होतो. बऱ्याच वेळा काय होतं  की डॉक्टरना भेटायच्या आधीच डॉक्टर आज काय म्हणतील ह्याची चर्चा होते जी नाही म्हटलं तरी थोडी स्ट्रेसफुलच असते. ती  टाळण्यासाठी मी गाडीत पु. लं चं  व्यक्ती आणि वल्ली लावलं  . गेल्या तीन तपांहून अधिक काळ ही पात्रं  भेटत असल्यानं त्यातला प्रत्येक शब्द परिचयाचा असतो तरी ऐकायला वेगळीच मजा येते. काल ‘नारायण’ भेटीला आला होता ….

का कोणास ठाऊक पण नारायण ऐकताना मला हसायलाही येतं  अन एक प्रकारची खिन्नताही जाणवते. मला वाटायचं की नारायण ह्या कथनाचा शेवट मला खिन्न  करून जातो …. ‘मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत पडलेले असतात बाकी सर्वत्र सामसूम असते …’ पण काल  अचानक जाणवलं  की ते तितकंसं खरं  नव्हतं … नारायणाच्या ऐन भरातल्या म्हणजेच लग्नाच्या तयारीच्या प्रसंगांनी मला कुठेतरी हसता हसता खोलवर खिन्न केलं …

पु.लं.च्या लेखणीची ताकद ही की आपण प्रत्यक्ष त्या प्रसंगात हजर आहोत असं आपल्याया वाटत राहतं आणि मग मी त्या लग्नाच्या तयारीत नारायणाच्या बाजू बाजूला हिंडत राहिलो … खरेदीचा प्रसंग …. मुलीची सासू म्हणजे शत्रुपक्षाची पुढारी …. मुलाकडच्यांना बोलायची काही म्हणजे काही रीत नाही …. ह्या वाक्यांना हसता हसता खोलवर कुठेतरी दुखावत गेलो …. लग्न म्हणजे काय असतं … दोन व्यक्ती आपलं  आयुष्य नव्याने चालू करतात तो आनंद दायी आणि मंगल प्रसंग असतो …. त्यांना आशीर्वाद द्यायला बाकीच्यांनी यायचं असतं …. त्यात मग मानापमान …. रुसवे-फुगवे हे सगळं किती अभद्र आहे पण दुर्दैवाने हे आपण सगळ्यांनीच बघितलंय आणि ह्याची आपल्याला इतकी सवय झाल्ये  की आपण ह्या सगळ्याचा फार कमी वेळा कडाडून विरोध केलाय ….

पण चांगली गोष्ट ही की ह्या सगळ्या अभद्र गोष्टी इतिहास जमा होत चालल्या आहेत… नव्या पिढीत कदाचित समारंभांना लोकं कमी येत असतील पण ते समारंभ जास्त आनंदाने आणि उत्साहाने साजरे होतात …. काही लोकं फक्त नातेवाईक किंवा ओळखीचे आहेत म्हणून त्यांना समारंभात बोलावण्यात काही फारसा अर्थ नाही …. जे लोकं तुमच्या आनंदात कुठलीही उणीदुणी ना काढता सहभागी होतात तेच तुमचे खरे आप्तेष्ट असतात …

आणि हो समारंभाच्या आमंत्रणालाच नाही तर हा नियम आपल्या आयुष्यात आपल्याला कोण हवंय आणि कोण नकोय ह्यासाठीही लावला तर आपलं सगळं आयुष्यच एक प्रकारचा आनंद सोहळा होऊन जाईल …. अभद्र प्रथा अन अभद्र माणसांना मात्र वेळच्या वेळी खड्यासारखं बाजूला करता आलं  पाहिजे ….

व्याघ्रदर्शन

नुकताच माझ्या कामासाठी मी ‘जिम कॉर्बेट’ नॅशनल पार्कला गेलो होतो. एका सुप्रसिद्ध कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे ठरवण्यासाठी वर्कशॉप होतं. त्यातला एक दिवस सगळ्यांनी जंगल सफारीला जायचं  ठरलं. उत्तराखंडच्या जानेवारी महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीला न  जुमानता सगळेजण बरोब्बर सकाळी साडेपाचला जमले. सगळ्यांच्या उत्साह ओसंडून वाहात होता. मग ओपन जिप्सी गाड्यांचा ताफा घेऊन सर्व निघालो. सगळ्यात मोठठी उत्सुकता अर्थातच व्याघ्र दर्शनाची होती. वाघ बघायला मिळाले की सर्व कष्टांचे चीज झाले असा एकंदरीत मूड होता. मग जंगलात काही गाड्यांना तो दिसला आणि काहींना नाही – सर्व चर्चा फक्त त्या ३० सेकंद दिसलेल्या वाघाचीच!

जेव्हा जेव्हा मी जंगल सफरींना जातो तेव्हा तेव्हा मला ही गम्मत दिसली आहे. फार कमी लोकांना जंगलाच्या अनुभवाने भरून येतं  – ज्यांना वाघ दिसतो त्यांना परमेश्वर-दर्शनाचा आनंद झालेला असतो तर ज्यांना दिसत नाही त्यांना सगळे कष्ट फुकट गेल्यासारखे वाटत असतं. वाघ बघितल्यावर आनंद होणं साहजिकच आहे कारण तो प्राणीच तसा राजबिंडा आहे. पण चार-पाच तासांच्या जंगलाच्या सफरीत तो क्षण फक्त एखाद्या मिनिटाचा असतो. वाघ बघण्याची तीव्र इच्छा असण्यात चुकीचे काहीच नाही पण बाकी जंगलही किती छान असतं ! जंगलाचा असा एक अतिशय तरतरीत करणारा एक गंध असतो. छान छान पक्षी असतात, मध्येच माना  वरून टकमक बघणारे हरणांचे कळप असतात. नुसतं जंगलात फिरणं हेच एक भाग्य असतं  पण कुणी त्याच्याकडे लक्षच देत नाही. मला कधी कधी  प्रश्न पडतो – इतक्या उत्साहाने जंगलात गेलेली माणसं लक्षात काय ठेवतात – तर त्या ४-५ तासातलं  मिळालेलं किंवा चुकलेलं  एक मिनिट!

मी जंगल सफरीत जे अनुभवतो ते प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवायला मिळतं  म्हणा – एखादं  ध्येय असणं अन त्यापायी झपाटलेलं  असणं छानच असतं  पण त्या ध्येयाइतकीच प्रवासाचीही मजा घेता आली पाहिजे. जे खरेखुरे निसर्गप्रेमी असतात त्यांनाही वाघ दिसण्याचा तेव्हढाच आनंद होतो आणि तो बघण्यासाठी तेही आटापिटा करतात पण हे करताना ते जंगलातल्या नवीन वाटा शोधतात – एखादा नवीन पक्षी दिसला तर त्याचं  निरीक्षण करतात – अगदीच ओळखता आला नाही तर त्याचा एखादा फोटो वगैरे काढून टिपण करतात आणि मग घरी गेल्यावर दुसऱ्यांशी चर्चा करून किंवा सलीम अलींच्या पुस्तकातला त्या पक्षाचा फोटो बघून हरखून जातात – वाघ दिसल्यासारखीच!

मला वाटतं आपलं  आयुष्यही असच आहे – एखाद्या जंगल-सफारी सारखं – एखादं  मोठं घ्येय जरूर असावं पण ते मिळणं – न- मिळणं हे आपल्या कर्तृत्वाचा नसून कधी कधी नशीबाचाही भाग असतो ही जाणीव ठेवावी. मला इथे सर एडमंड हिलरींची गोष्ट आठवते – ते जेव्हा माउंट एव्हरेस्टवर शेर्पा तेनसिंगबरोबर पोहोचले तेव्हा त्यांना जाणीव होती की तिकडे अगदीच थोडा वेळ वर थांबता येणार होतं मग त्यांनी पटकन तेनसिंगचा फोटो काढला – जगविख्यात अशा त्या पराक्रमाच्या घटनेच्यावेळी स्वतःचा फोटोच काढला नाही कारण कदाचित तो क्षण आणि तो प्रवास ते स्वतःसाठी जगले – दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही. एखाद्या ध्येयाची आपल्याला ओढ असेल तर त्या ध्येयाचा मार्गही आपण जगतो – मैलोनमैल आणि कित्येक दिवस पायपीट केलेला वारकरी पांडुरंगाच्या देवळाच्या नुसत्या कळसाच्या दर्शनानेही धन्य होतो – त्याचे डोळे पाणावतात – ते तीर्थ जगात कदाचित सर्वात पवित्र असतं !!

सुखाची गुरुकिल्ली

दोन आठवड्यापूर्वी मी नागपूरला गेलो होतो. नागपूरहून  हिंगणघाटजवळच  आहे. आता हिंगणघाटमध्ये विशेष काय म्हणाल तर माझ्यासाठी आणि पल्लवीसाठी ती  जागा खासच आहे. जवळजवळ सोळा वर्षांपूर्वी मला आणि पल्लवीला हिंगणघाटच्या मंदिरात श्रीमाधवनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची अविस्मरणीय संधी मिळाली होती. म्हणून हिंगणघातला जाणं माझ्यासाठी खास होतं. नागपुरात गाडी भाड्याने घेऊन मी हिंगणघाटला गाडी चालवत निघालो…. बरीच वर्षं  लोटली होतीमला आधीच्या अनुभवावरून वाटलं होतं की मला पोहोचायला दोनएक तास लागतीलपण इतक्या वर्षांत  रस्ते इतके छान झाले होते की मी तासाभराच्या आताच पोहोचलो. दुसरं म्हणजे मी पूर्ण विसरलो होतो की हिंगणघाट हे तसं  मोठे शहर आहे आणि इतक्या वर्षांत  ते सुद्धा बदललं  असेल. मी तर मंदिराचा पत्ताही घेतला नव्हतासाधारणपणे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ मंदिर आहे एव्हढच आठवत होतं. . हायवेवरून गाडी वळवली आणि मग ठरवलं  की बघू आपल्याला मंदिर सापडतंय  का. मग कुणालाही ना विचारात गल्ल्याबोळांतून गाडी चालवत निघालो. एक कापडगिरणीची चिमणी दिसल्यावर काहीतरी ओळखीचं वाटलं म्हणून उजवं  वळण घेतलं  आणि गाडी बरोब्बर मंदिराच्या दारात थांबली.

एक अनुभव म्हणून मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला. माझा एक मित्र मला लगेच म्हणाला, “तुझ्या श्रद्धेनं तुला बरोबर मंदिरापाशी सोडलं “. दुसरा लगेच ताड्कन म्हणाला, “काहीतरी फालतू बोलू नकोस  विज्ञानानं हे सिद्ध केलय की आपला मेंदू एखाद्या सुपरकॉम्प्युटरसारखाअसतो. एकदा माहिती साठवली गेली की ती कायमची राहते आणि कधीही वापरता येते. त्याला कुठलही टेन्शन नव्हतं  म्हणून त्याला माहिती सहज आठवली” … “अरे सोड अध्यात्माच्या समोर विज्ञान बिगरीतअसतं.” …. एक वेगळाच वाद चालू झाला…. असे काही वाद चालू झाले की माझं मन आपोआपस्विचऑफहोतं.

मतभिन्नता असण्यात चुकीचं काहीच नाही पण आपल्यापेक्षा वेगळ्या मताबद्दल जो तिरस्कार असतो तो मात्र मला नेहमीच अस्वस्थ करून जातो. आपली मतं  ही बऱ्याच वेळा आपल्या संस्कारांवरून किंवा अनुभवावरून तयार झालेली असतात.  आपल्याला आलेल्या अनुभवापेक्षा दुसऱ्यांचे अनुभव वेगळे असू शकतात. आपल्यापेक्षा दुसऱ्यांची मतं ही वेगळी असू शकतात ती चूक किंवा बरोबर ठरवायची खरंच गरज असते का हा प्रश्न आपल्याला विचारून बघावाआयुष्य सोपं  होईल.

एव्हढ्यात माझ्या मित्रांनी मला विचारलं कीतुला स्वतःला काय वाटतं तुला मंदिरापर्यंत कोणी नेलं श्रद्धेनं की विज्ञानानं?” मी नुसताच खांदे उडवून हसलो आणि मग मात्र दोघांचं एकमत झालंछ्या ह्याला काही मतच  नसतंनुसतंच डिप्लोमॅटिक वागतोय“…. मला आता प्रश्न पडलाय की ह्यांना कसं  समजावून सांगावं  की मला दोघांचीही मतं  पटतायंत  माझं मतानें जिथे फरक पडतो तिथेच मी मत व्यक्त करतो …. मोदी की राहुल ह्यावर व्हॉट्सअपवरून मित्रमैत्रिणींशी माऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा मतदानाच्या दिवशी मी माझं मत ना चुकता देईन आणि जो निकाल लागेल त्याचा आदर करीनलोकांच्या मतांमागे त्यांची आपली काही भूमिका असेलच …. जरी तो निकाल माझ्या मतांपेक्षा वेगळा असला तरीही त्याचा आदर करणे आवश्यक आहे बाकीच्यांचं  माहित नाही पण माझ्यापुरतं  तरी माझं  आयुष्य मतामतांच्या गलबल्यात शांत आणि सुखी आहे! हीच माझ्या सुखाची गुरुकिल्ली आहे !

माईंड द गॅप

जवळ जवळ सत्तावीसअठ्ठावीस वर्षं  झाली तरीही मला तो प्रसंग कालच घडल्यासारखा स्वच्छ आठवतो आहे.  “मी माझ्या आयुष्याची जोडीदार निवडली आहेमी माझ्या आईबाबांना सांगितलं. ह्यात वावगं काही नसलं  तरी परिस्थिती जरा स्फोटकच होती. मी बी एस. सी. करून आय.,एस. ची तयारी करायला म्हणून घरी बसलो होतो. लायब्ररीत अभ्यास करता करता पल्लवी भेटली आणि मग आम्ही एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं ठरवलं. माझे सासूसासरेहि धाडसीचआपल्या अठरा वर्षाच्या मुलीने रिकामटेकडा जोडीदार शोधलाय हे पचवायला धैर्य लागतं आणि आता माझी मुलगी एकवीस वर्षाची असल्याने मला जरा ते जास्त चांगले समजतंय !!  माझ्या घरी हा मी जेव्हा बॉम्ब टाकला तेव्हा काय झालं त्यानं माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा दिली. 

मी ही बातमी सांगितल्यावर माझ्या बाबांनी मला शांतपणे विचारले, “आयुष्यात कशाच्या जोरावर हा एव्हढा  महत्वाचा निर्णय घेतलास ?” काही सुचल्याने मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं,”तुमच्या” – त्या तशाही परिस्थितीत माझ्या प्रामाणिकपणाने ते सुखावल्याचा मला भास झाला अन जरा हायंसच वाटलं. माझ्या चित्रपटविषयक अभ्यासाप्रमाणे मला एखादी कानफटीत वगैरे बसायला हवी होती. त्यांनी तितक्याच शांतपणे पुढचा प्रश्न विचारला, “बरं  मी सोडून आणखी काही?” “मी उत्तम करियरकरीन ना!” मी एका क्षणात उत्तर दिलं. “मग ठीक आहे. हा निर्णय कधीतरी तुलाच घ्यायचा होता तो तू थोडा लवकर घेतलास असं  वाटलं इतकंच. बरं  तुला कितीही शिकायचं वगैरे असेल तरीही शीक. उगाच आता कुठल्यातरी नोकरीची वगैरे घाई नको करूस. वेळ आली तर मी लग्नही करून पोसीन दोघांनाही पण करियर काहीतरी चांगलं  कर” …. विषय संपला …. मी काय काय संवाद मनात ठेवले होते ते फुकटच गेले आणि पळूनबिळून जायची तर ह्यांनी काही सोयच नव्हती ठेवली!!

तोपर्यंत माझं  बापकमाईवर मस्तच चाललं होतं  आणि हे जितके दिवस चालतंय तेव्हढं चालवायचा माझा एक धोरणी विचार होता. पण वरच्या प्रसंगानंतर खोल काहीतरी बदललं आणि चांगलं करियर करायचे आणखी काही पर्याय आहेत का ह्याचा गंभीरपणे विचार करायला लागलो. त्यातून मग हातपाय हलवून एका नामांकित कॉलेज मध्ये एम.बी.. ला प्रवेश घेतला आणि पुढे करीयरही बरंच  झालं. 

वरच्या प्रसंगांनी मला आयुष्याची दिशाच नाही दिली तर एक अतिशय महत्वाचा धडा दिला.  आपण जनरेशन गॅप वगैरे बद्दल खूप ऐकतो पण ती कशी हाताळायची ह्याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला. जो निर्णय माझ्यासाठी खूप महत्वाचा होता तो मी घेतला. ह्यानंतर त्यात चुका कितीही काढता आल्या असत्या …. “तुला अजून काय अक्कल/लायकी आहे …. जगाचा अनुभव काय आहे …. ” वगैरे वगैरे बरंच काही. पण त्यांनी त्या निर्णयावर विश्वास ठेवला…   वयनात्याचा मोठेपणा बाजूला सोडून हा निर्णय माझा असला पाहिजे हे पाहिलं  मान्य करायला काळीज लागतं, स्वतःच्या संस्कारांवर / नात्यावर विश्वास लागतो. मी तो निर्णय घेतला आहे हे बघितल्यावर तो निर्णय यशस्वी कसा होईल आणि पल्लवी अन मी सुखी कसे होऊ ह्याचाच विचार केलामला आठवतंय आमचं  लग्न झाल्यावर त्यांनी पल्लवीला सांगितलं  होतंतुला जेव्हा कधी काही लागलं  तर मला सांगत्या गाढवाला त्याचाच पगार पुरत नाही !!”

एका शब्दानीही  उपदेश करता ह्या सगळ्या गोष्टी मला खूप काही शिकवून गेल्या. “जनरेशन गॅपही काय फक्त घरीच नसते ऑफीसमध्येही असते. पदाचे हुद्द्याचे मानअपमान बाळगता आपण जर आपल्या सहकाऱ्यांचे निर्णय यशस्वी करायला गेलो तर सगळ्यांचंचआयुष्य सुखी होतं ! जर बाबांनी माझी अक्कल काढली असती तर मीही इरेला पेटलो असतोमग करियर वगैरे करायपेक्षा नुसतेच बंड  करून काहीतरी मूर्खासारखं करून बसलो असतोनुकसान सगळ्यांचंच झालं  असतं ! त्यांनी ते होऊनच दिलं  नाही. माझ्या आयुष्यात, करियरमध्ये मी जमेल तेव्हा हा  फॉर्म्युला वापरलातो किती परिणामकारक होता हे कदाचित माझे कुटुंबीय किंवा सहकारीच सांगू शकतील. 

साधारणपणे एकवीसएक वर्षांनंतर माझ्याच विद्यापीठाने पुढे जेव्हा मला पदवीदान समारंभाला जेव्हा प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं तेव्हा त्या समारंभाला मी बाबांना आवर्जून घेऊन गेलोतो गाऊन वगैरे घालून उपकुलगुरुंच्या मागे चालत जाताना का कोण जाणे मला सारखा आमचा संवाद आठवत होता ! जनरेशन गॅप ही असतेच त्याची जाणीव ठेऊनजपूनच पाऊल टाकावं  लागतं हेच खरंलंडन च्या ट्यूब रेल्वेस्टेशन वर सांगतात तसं  “माईंड  गॅप“!!

योगेश पाटगांवकर

८ डिसेम्बर २०१८

तर्काच्या पलीकडले …

लहानपणी  समर्थ रामदास स्वामींच्या कथांचं  एक पुस्तक वाचताना त्यातल्या ब-याच कथा खूप छान वाटल्या पण त्यांचे अर्थ हे ब-याच वर्षांनी हळू हळू कळत गेले त्यातलीच ही एक कथा …. एकदा  समर्थ रामदासस्वामी आणि शिवाजी महाराज गडावर फेरफटका मारत असताना गडाच्या डागडुजीचं  काम चाललं होतं. बरीच लोकं  त्या कामात गुंतली होती. चालता चालता महाराजांच्या मनात सहज विचार आला की मी तर ह्या सा-यांचा पोशिंदा आहे आणि महाराज मनातल्या मनात सुखावले. महाराजांच्या मनातले विचार ओळखून समर्थ मिश्कीलपणे आपल्याशीच हसले आणि तिथे असलेल्या पाथरवाटला जवळचीच एक शिळा बरोब्बर अर्धी कापायला सांगितली – पाथरवाटाने तसं  केल्यावर सगळेच अचंबितपणे पाहात राहिले – त्या फोडलेल्या शिळेत एक छोटासा खळगा होता आणि त्या खळग्यांत असलेल्या पाण्यात छोटीशी एक बेडकी मजेत खेळत होती. समर्थ महाराजांना म्हणाले,”राजे आपण धन्य  आहात. ह्या चिमुकल्या जीवाचीसुद्धा आपल्या गडावर किती छान काळजी घेतली आहेत.” महाराज ओशाळले आणि तिकडेच समर्थांना दंडवत घातला. आपल्या महापराक्रमी अनुयायाला रोखठोक सांगणारे ते गुरु आणि आपल्या कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन ते समजून घेणारे अनुयायी दोघेही वंदनीय!

ही कथा वाचली आणि जसजसा जगाचा अनुभव येत गेला तसतसा हळू हळू ह्या कथेचा अर्थ कळत गेला. विशेषतः: हल्लीच्या काळात अत्यंत कर्तृत्ववान अशा समजल्या जाणा-या व्यक्तींचा अचानक झालेला अध:पात बघून तर ही गोष्ट मला परत परत आठवते. मला वाटतं  आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटण्यात काहीच गैर नाही पण आपल्या यशामध्ये आपल्या कर्तृत्वापलीकडेही काही असते ही जाणीव असलेली बरी असते. मग ते नशीब असेल, सद्गुरुकृपा असेल, आई-वडिलांचे आशीर्वाद असतील, योग्य वेळेला मिळाली योग्य संधी असेल किंवा योग्य वेळेला भेटलेली योग्य माणसं  असतील पण  आपल्या बुद्धीला समजणा-या  तर्काच्या पलीकडेही काहीतरी असतं ही जाणीव पाय जमिनीवर ठेवायला मदत करते. बरं  ह्या जाणिवेचा  आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काहीच संबंध नसतो. माझ्या यशात माझ्यापलीकडे काहीतरी आहे ही जाणीव षड्रिपूंपैकी सर्वात घातक जो मद  किंवा अहंकार आहे त्यापासून संरक्षण करते.

जर ह्या जाणिवेचं  कवच नसेल तर अहंकार बुद्धीचा ताबा घेतो आणि  माणसाची परिस्थितीचं आकलन करून घ्यायचीही क्षमता कमी होते. कधी कधी आहे ती परिस्थिती मान्य  करून पुढे जाण्यातच शहाणपण असतं. गीतरामायणात भरतभेटीचा प्रसंग अतिशय तरलपणे  वर्णन  केला आहे. शोकाकूल झालेल्या आणि परत परत रामाला वनवासातून परत येण्याची विनंती करणा-या भरताला मर्यादापुरुषोत्तम श्रीराम समजावून सांगतात “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा – दोष ना कुणाचा” अन मग पुढे जाऊन असंही समजावतात की “मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा” – जाणत्याच्या तर्कालाही शेवटी मर्यादा आहेतच – जे दिसतं  आणि जोपर्यंत दिसतं  तिथपर्यंतच तर्कांची  मजल असते पण त्यापुढेही काहीतरी असतं  हे ध्यानात घेणं  हा खरा सुज्ञपणा आहे.  एक लक्षात घेतलं पाहिजे की हे विचार ही हतबलता नाही आहे. सर्व भावनांच्या पलीकडे जाऊन त्यावेळेला वनवासात जाणं हेच बरोबर होतं आणि त्यासाठी कैकेयी किंवा दशरथाला दोष देण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्यात एक शहाणपण आहे. आत्मविश्वास आणि अहंकार ह्यातली सीमारेषा पुसटच असते. दुर्दैवानं अहंकार आणि शहाणपण हे एकत्र राहूच शकत नाहीत. म्हणूनच जर आत्मविश्वास आणि अहंकारातली सीमारेषा ओलांडायची नसेल तर तर्कापलीकडच्या जाणिवेचं कवच आवश्यक आहे.

ही जाणिव जागृत कशी ठेवायची हा प्रश्न फारसा अवघड नाही. वर सांगितलेल्या कथेत महाराज अहंकाराची सीमारेषा ओलांडताना सहज थांबू शकले कारण साक्षात समर्थ त्यांना जागं करायला होतं. आपल्यासारख्या माणसांना समर्थांचा सहवास नसेल तरीही ह्या जाणिवेचं  कवच परिधान करणं  सोपं  आहे. समर्थांच्याच समकालीन तुकोबारायांनी सांगून ठेवलंय “निंदकाचे घर असावे शेजारी” – जेव्हा आपण यशाच्या पाय-या चढत असतो तेव्हा फक्त आपल्या आजूबाजूला असणं-या लोकांना आपल्याशी परखड बोलणं किती सहज जमतं ह्याच्यावर आपलं  शहाणपण ठरतं. त्यासाठी परखड मतांवर तुमची प्रतिक्रिया काय असते ह्यावर सगळं अवलंबून आहे – माझ्याशी वाद घालणारा किंवा माझ्या मताशी सहमत नसणारा म्हणजे शत्रू हा विचार डोक्यात आला कि संपलच सगळं !!

कधी कधी एखाद्या गोष्टीचं  उत्तर ही वेळ असते हेही मान्य करावं  लागतं, नाही केलं तर आपल्याला शिकवायची सोयही निसर्गानेच केलेली असते आणि मग आपली अवस्था कमळात अडकलेल्या भुंग्यासारखी होते ती आपली कोणाचीच न होवो हीच प्रार्थना!

काळोखाचे साम्राज्य पसरते अन कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते

दिवसभर दंगा करणाऱ्या भुंग्याची स्वारी अलगद आत अडकते

जीवाच्या आकांताने भुंगा सुटायची धडपड करतो

नाजूकशा कमळापुढे त्याचा दंगा जरा कमीच पडतो

सकाळची कोवळी किरणे अलगद उतरतात

अन कमळाला गोंजारून भुंग्याला सोडवतात

एक काळोखी घुसमटलेली रात्र भुंग्याला शहाणे करून सोडते

कळते त्याला, की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपले बळ नसते

कधी कधी आपण नुसतेच थांबायचे असते

अन उत्तर हे आकाशातल्या बापाने ठरवलेली वेळ असते!!

योगेश पाटगांवकर

३० नोव्हेंबर २०१८

स्वच्छंद

एअरपोर्टवर  कॉफी पीत असतानाच बाजूच्याच टेबलवर एक आई तिच्या छोट्या बाळाला तिच्या डब्यातून आणलेली पेज भरवत होती. आजूबाजूच्या कोलाहलात आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गर्दीत ते मूल मजेत  एक एक चमचा खात होतं अन खिदळत होतं. तसं साधंच  दृश्य पण कुठेतरी मनाला भिडलं. लहानपणी आईनं कालवलेल्या वरण-भाताची आठवण आली आणि मनात जरा कालावकालावच झाली. आईला तिथूनच फोन करून सांगितलं तर हसली आणि म्हणाली “कामाच्या आणि सारख्या प्रवासाच्या  धावपळीत  तुला मनापासून आवडणा-या साध्या सध्या गोष्टी राहत गेल्या की मग असच होतं. पूर्वी कविता वगैरे लिहीत होतास ते सुद्धा सोडून दिलयंस की – आणि पुढच्या वेळी आलास की देते भात कालवून!” – मला वाटतं कितीही पुस्तकं  वाचली तरीही हे असे प्रश्नं  आईच अजूनही एखाद्या वाक्यात सोडवते! तिथं बसल्या बसल्याच मराठी लिहायला सुरुवात करायाची हे ठरवून टाकले. नुसत्या विचारांनीच आईनं कालवलेला वरण -भात समोर ठेवल्यासारखा वाटला ! ब्लॉग लिहायला सुरुवात करायचं ठरवलं  आणि माझ्या कुठलेही नियम नं पाळणा-या मनाला स्वच्छंद हेच नाव सुचलं

आता लिहायची सुरुवात कुठे करायची असा विचार करत करत विमानात शिरलो. असं म्हणतात कुठलीही नवी गोष्ट चालू करताना गजाननाला वंदन करावे आणि म्हणून मराठी ब्लॉग चालू करताना म्हणून मी माडगूळकरांच्या गजाननाला वंदन करायचे ठरवले.

गदिमांची मराठी ही थेट काळजाला भिडते. भाषेवर प्रभुत्व आपण म्हणतो तेव्हासुद्धा  कुठेतरी कष्टाने काहीतरी साध्य केल्यासारखे वाटते . एखादी तरुणी मेक-अप वगैरे केल्यावर  सुंदर दिसते पण नुकतीच न्हाऊन आलेली एखादी तरुणी आपल्या तंद्रीतच आपले केस सावरताना जशी सहज सुंदर दिसते ते सौन्दर्य अलौकिक असतं  – गदिमांच्या मराठीची जातकुळी ही तशीच वाटते! सहज वापरातले शब्द एकत्र येऊन जी जादू करतात त्याला तोड नाही.

‘कुश-लव रामायण गाती’ हे माझं सगळ्यात आवडतं गाणं! पुत्र आपल्या पित्याची स्तुती करतात हा लाघवी प्रसंग गदिमा आपल्या डोळ्यासमोर उभा करताना “पुत्र संगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती” असं सहज म्हणून जातात. आपले वडील आदर्श असलेल्या कुठल्याही पुत्राच्या अंगावर रोमांच उभे राहतील असे हे शब्द आहेत परत गम्मत बघा ह्यात कुठलाही कठीण शब्द नाही की ओढून ताणून आणलेलं यमक नाही. बरं  ते काव्य-गायन तरी कसं  तर “वाल्मिकीच्या भाव मनीचे मानवी रूपे साकारती”.

हे गायन ऐकताना श्रोते तर भारावले आहेतच पण मर्यादापुरुषोत्तमाची अवस्थाही गदिमा एका ओळीत सांगून जातात – “प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रभूचे लोचन  पाणावती” – अत्यंत धीरोदात्तपणे पुत्रधर्म आणि राजधर्म पाळणा-या मर्यादापुरुषोत्तम रामही आपले अश्रू आवरू शकला नाही – भक्तीचे सर्वात उत्कट रूप हे मनातले भाव असतात आणि ते जेव्हा दोन निरागस अशा बालमुखातून प्रकट होतात तेव्हा मर्यादापुरुषोत्तमही हळवे होतात हे गदिमा किती सहज सांगून जातात. ह्या ओळी कितीही वेळा ऐकल्या तरीही कंठ दाटून येतो अशी ह्या शब्दांची ताकद आहे.

ह्या गीताच्या शेवटचे जे शब्द आहेत त्यावर  काही लिहायची माझी ताकदच नाही! पिता-पुत्र भेटीचा हा हृदय प्रसंग आहे आणि त्यातल्या कुणालाच हे नाते माहित नाही आहे आणि ह्याचे वर्णन ज्या शब्दात माडगूळकर करतात त्याला तोड नाही. त्यांची कुठलाही आवेश नसलेली भाषा थेट काळजाला कशी भिडते त्याचं  हे उदाहरण आहे. ते शब्द लिहून माडगूळकरांच्या त्या गजाननाला परत वंदन करतो:

सोडूनि आसन उठले राघव

उठून कवळिती आपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव

परी तो उभया नच माहिती

‘कुश-लव रामायण गाती’

  • योगेश पाटगांवकर, २५ नोव्हेम्बर २०१८