गप बस बावळटा !

माझं आणि माझ्या आईचं नातं हे कुठल्याही माय-लेकाच्या नात्यासारखं तर आहेच (होतं लिहिण्याची ताकद माझ्यात नाही!) पण वात्सल्याबरोबरच त्याला आणखीही काही मजेशीर कंगोरे आहेत. जीवाभावाचे सोबती जसे एकमेकांना प्रेमाने दणके देतात तसेच काहीसे आम्ही कायम एकमेकांशी वागत आलो. आत्ता सुद्धा “बघ मेल्या – निमिष, विनया , पल्लवीने माझ्याबद्दल किती छान लिहिलंय – तू का झोपा कढतोयस!” असं कुठे तरी ऐकल्याचा मला भास झाला. जे लोकं तिला वर्षानुवर्षे ओळखतायत त्यांना मला नक्की काय म्हणायचंय ते बरोब्बर कळेल!

तसा आमचा दोघांचा मूळ स्वभाव लढाऊ ह्या स्वरूपाचा (अर्थात तिच्या मते तिचा स्वभाव लढाऊ अन माझा आगाऊ!) पिल्लांना जसे मांजरीचे दात लागत नाहीत तसे तिचे बोलणे मला कधीच लागायचे नाही – पण त्यामुळे तिची पंचाईत अशी व्हायची की तिला हवे तसे वागायला (विशेषतः तिच्या पथ्य-पाण्याबद्दल) ती जेव्हा मुक्तपणे सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची त्याचा माझ्यावर परिणाम व्हायचा नाही मग बऱ्याच वेळा चिडून ती मला शेवटी “गप बस बावळटा!” म्हणायची.

आमच्या दोघांचे हे मुक्तछंदातले ठोसे आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यकही होते. लहानपणापासूनच माझ्या स्वतःबद्दल फाजील कल्पना आहेत. मी असा बेबंद हवेत भरकटायला लागलो की कुठे तरी माझ्या पतंगाचे “काय पो छे” व्हायायच्या आत ती मला सुरक्षितपणे खाली आणायची! ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझा अटलजींकडून मेडल घेतानाचा फोटो बघून आमचे एक शेजारी जेव्हा कौतुकाने म्हणाले “भावी पंतप्रधान !” तेव्हा मी लाजलो – तिकडून बाहेर पडल्या पडल्या माझ्या पाठीत दणका घालून ती म्हणाली “मेल्या ते अटलजींबद्दल बोलत होते – तू कशाला लाजलास?” त्या फोटोतला दुसरा माणूस ह्या स्तुतीसाठी माझ्यापेक्षा योग्य आहे ह्याची मला जाणीवही नव्हती आणि तिच्या इतके मला कधीच कुणी ओळखलं नाही !

माझे तिचे वाद हे बहुतांशी तिच्या पथ्य-पाण्यावरून असायचे – ती कुणाचं ऐकत नाही ह्या निष्कर्षावर आल्यावर बहुतेक वेळा मला गुंडासारखी तिच्याशी वाद घालायची सुपारी मिळायची. अतिशय कलात्मक रित्या वेगवेगळ्या प्रकारे काळजाला घरे पडणारे (तिच्या मते) “dialogues” संपले आणि तरीही मी माझा मुद्दा सोडला नाही की आमच्या वादाचं भरतवाक्य ठरलेलं असायचं. पण हा राग फार वेळ टिकायचा नाही आणि दुसऱ्यांसमोर तर कधीच नाही – फक्त एकदा मात्र आमचं भांडण झाल्यावर तिला सांभाळायला आलेल्या ‘आया’ ला माझी ओळख “हा माझा मोठा मुलगा – प्रेमळ आहे पण थोडा उद्धट आहे” अशी करून देण्यात आली होती पण असा प्रसंग विरळा – एरव्ही तिची मुलं (ह्यात सुना जावई पण आले) म्हणजे तिचा अभिमान होता.

तिची ऊठसूट सगळ्यांबद्दल खायला घालण्याची हौस तर सर्वज्ञात आहे आणि त्यातून कुणाचीच सुटका नव्हती. तिच्या मते तिच्यापेक्षा लहान कुणालाही “तुमचं खायचं -प्यायचं वय आहे हे बिनदिक्कतपणे सांगण्याचा तिचा हक्क होता ह्यात तिच्या विहिणी – म्हणजे सुनांच्या आयांची पण सुटका नव्हती – त्यांचही “कौतुक” करायची हुक्की अनावर व्हायची – आणि कौतुकाचा प्रकार एकच – खाउ घालणे – काही महिन्यांपूर्वी मला म्हणाली “पल्लवीच्या आईला माझा साखरभात आवडतो. एकदा माझ्या हाताने करून पोटभर खायला घालणार आहे!” आपण काय बोलतो आहे ह्यातली विसंगती वगैरे तिला कधी दिसायचीच नाही. मी तिला म्हणालो “अगं त्यांची पण सत्तरी आली. त्यांनी नाही खाल्लं तरी चालेल!” – अर्थात ह्या संवादाची सांगता तिच्या नेहेमीच्या वाक्याने झाली! गायत्रीच्या आईबद्दलसुद्धा बोलताना कुणी ऐकलं असतं तर घरातल्या एखाद्या “चुणचुणीत” मुलीबद्दल ती बोलत्ये असं कोणालाही वाटलं असतं !!

तिच्या सुना-नातवंडांपासून ती सगळ्यांचीच “शेंता” होती आणि ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरीही तिची सुना-नातवंडेही तिला त्याच नावाने हाक मारायची. मुक्तपणे बोलणे आणि भांडणे हे तिला आवडायचं – जसे दोन कसलेले गायक एकमेकांच्या गायकीचं कौतुक करतात तसं मला एकदा म्हणाली “तुझ्याशी वाद घालायला (सध्या शब्दात भांडायला !) मजा येते. तू कसा निर्लज्ज आहेस – बाकीचे फारच मनाला लावून घेतात!” ह्यावर हसावं की रडावं (कि नवीन भांडण उकरून काढावं) मला काही कळलं नाही !

आमच्या लुटुपुटुच्या भांडणात कधी कधी ती काळजाला घर पाडून जायची ! हल्ली काही महिन्यापासून नाही म्हटलं तरी ती तिच्या तब्येतीला कंटाळली होती. मग मला बोलता बोलता म्हणाली “बस्स झालं आता माझं” आमच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे अजिबात गंभीर ना होता मी तिला चेष्टेत म्हणालो “नको ग बाई काहीतरी बोलू – मग आम्हाला आई कुठली – बाबांना ह्या वयात दुसरी कुणी मिळणं कठीणच आहे.” ह्यावर खूष होऊन ती खो-खो हसली मग हसणं थांबल्यावर अचानक म्हणाली “अरे असा किती दिवस आईचा हट्ट धरणार तुम्ही लोकं” नशीबानं आमचं बोलणं फोनवर चाललं होतं – त्यामुळे आमच्यातला अलिखित नियम मोडून मला गहिवरून आलं, जाणवलं की तिची इच्छा संपल्यावरही जन्मभर आमचे सगळे हट्ट पुरवून झाल्यावरही केवळ आमच्या हट्टासाठी ती आता जगत होती ! मला काहीच बोलणं सुचलं नाही – कधीतरी वाटतं त्यावर नेहमीसारखं बोलायला हवं होतं काही तरी आचरटासारखं – कदाचित अजून हट्ट पुरवला असता!

तिला शेवटी शरीरानं झेपत नव्हतं म्हणून जिथून तिला कुणीच हलवू शकणार नाही अशा ठिकाणी – आमच्या हृदयात तिने आपला मुक्काम हलवला – मला खात्री आहे – नेहेमीप्रमाणे मी आगावूपणा केला की ती मला तिथूनच म्हणेल “गप बस बावळटा”!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s