काल आई-बाबांना डॉक्टरकडे नेहेमीच्या चेक-अप ला घेऊन चाललो होतो. बऱ्याच वेळा काय होतं की डॉक्टरना भेटायच्या आधीच डॉक्टर आज काय म्हणतील ह्याची चर्चा होते जी नाही म्हटलं तरी थोडी स्ट्रेसफुलच असते. ती टाळण्यासाठी मी गाडीत पु. लं चं व्यक्ती आणि वल्ली लावलं . गेल्या तीन तपांहून अधिक काळ ही पात्रं भेटत असल्यानं त्यातला प्रत्येक शब्द परिचयाचा असतो तरी ऐकायला वेगळीच मजा येते. काल ‘नारायण’ भेटीला आला होता ….
का कोणास ठाऊक पण नारायण ऐकताना मला हसायलाही येतं अन एक प्रकारची खिन्नताही जाणवते. मला वाटायचं की नारायण ह्या कथनाचा शेवट मला खिन्न करून जातो …. ‘मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत पडलेले असतात बाकी सर्वत्र सामसूम असते …’ पण काल अचानक जाणवलं की ते तितकंसं खरं नव्हतं … नारायणाच्या ऐन भरातल्या म्हणजेच लग्नाच्या तयारीच्या प्रसंगांनी मला कुठेतरी हसता हसता खोलवर खिन्न केलं …
पु.लं.च्या लेखणीची ताकद ही की आपण प्रत्यक्ष त्या प्रसंगात हजर आहोत असं आपल्याया वाटत राहतं आणि मग मी त्या लग्नाच्या तयारीत नारायणाच्या बाजू बाजूला हिंडत राहिलो … खरेदीचा प्रसंग …. मुलीची सासू म्हणजे शत्रुपक्षाची पुढारी …. मुलाकडच्यांना बोलायची काही म्हणजे काही रीत नाही …. ह्या वाक्यांना हसता हसता खोलवर कुठेतरी दुखावत गेलो …. लग्न म्हणजे काय असतं … दोन व्यक्ती आपलं आयुष्य नव्याने चालू करतात तो आनंद दायी आणि मंगल प्रसंग असतो …. त्यांना आशीर्वाद द्यायला बाकीच्यांनी यायचं असतं …. त्यात मग मानापमान …. रुसवे-फुगवे हे सगळं किती अभद्र आहे पण दुर्दैवाने हे आपण सगळ्यांनीच बघितलंय आणि ह्याची आपल्याला इतकी सवय झाल्ये की आपण ह्या सगळ्याचा फार कमी वेळा कडाडून विरोध केलाय ….
पण चांगली गोष्ट ही की ह्या सगळ्या अभद्र गोष्टी इतिहास जमा होत चालल्या आहेत… नव्या पिढीत कदाचित समारंभांना लोकं कमी येत असतील पण ते समारंभ जास्त आनंदाने आणि उत्साहाने साजरे होतात …. काही लोकं फक्त नातेवाईक किंवा ओळखीचे आहेत म्हणून त्यांना समारंभात बोलावण्यात काही फारसा अर्थ नाही …. जे लोकं तुमच्या आनंदात कुठलीही उणीदुणी ना काढता सहभागी होतात तेच तुमचे खरे आप्तेष्ट असतात …
आणि हो समारंभाच्या आमंत्रणालाच नाही तर हा नियम आपल्या आयुष्यात आपल्याला कोण हवंय आणि कोण नकोय ह्यासाठीही लावला तर आपलं सगळं आयुष्यच एक प्रकारचा आनंद सोहळा होऊन जाईल …. अभद्र प्रथा अन अभद्र माणसांना मात्र वेळच्या वेळी खड्यासारखं बाजूला करता आलं पाहिजे ….