नुकताच माझ्या कामासाठी मी ‘जिम कॉर्बेट’ नॅशनल पार्कला गेलो होतो. एका सुप्रसिद्ध कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे ठरवण्यासाठी वर्कशॉप होतं. त्यातला एक दिवस सगळ्यांनी जंगल सफारीला जायचं ठरलं. उत्तराखंडच्या जानेवारी महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीला न जुमानता सगळेजण बरोब्बर सकाळी साडेपाचला जमले. सगळ्यांच्या उत्साह ओसंडून वाहात होता. मग ओपन जिप्सी गाड्यांचा ताफा घेऊन सर्व निघालो. सगळ्यात मोठठी उत्सुकता अर्थातच व्याघ्र दर्शनाची होती. वाघ बघायला मिळाले की सर्व कष्टांचे चीज झाले असा एकंदरीत मूड होता. मग जंगलात काही गाड्यांना तो दिसला आणि काहींना नाही – सर्व चर्चा फक्त त्या ३० सेकंद दिसलेल्या वाघाचीच!
जेव्हा जेव्हा मी जंगल सफरींना जातो तेव्हा तेव्हा मला ही गम्मत दिसली आहे. फार कमी लोकांना जंगलाच्या अनुभवाने भरून येतं – ज्यांना वाघ दिसतो त्यांना परमेश्वर-दर्शनाचा आनंद झालेला असतो तर ज्यांना दिसत नाही त्यांना सगळे कष्ट फुकट गेल्यासारखे वाटत असतं. वाघ बघितल्यावर आनंद होणं साहजिकच आहे कारण तो प्राणीच तसा राजबिंडा आहे. पण चार-पाच तासांच्या जंगलाच्या सफरीत तो क्षण फक्त एखाद्या मिनिटाचा असतो. वाघ बघण्याची तीव्र इच्छा असण्यात चुकीचे काहीच नाही पण बाकी जंगलही किती छान असतं ! जंगलाचा असा एक अतिशय तरतरीत करणारा एक गंध असतो. छान छान पक्षी असतात, मध्येच माना वरून टकमक बघणारे हरणांचे कळप असतात. नुसतं जंगलात फिरणं हेच एक भाग्य असतं पण कुणी त्याच्याकडे लक्षच देत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो – इतक्या उत्साहाने जंगलात गेलेली माणसं लक्षात काय ठेवतात – तर त्या ४-५ तासातलं मिळालेलं किंवा चुकलेलं एक मिनिट!
मी जंगल सफरीत जे अनुभवतो ते प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवायला मिळतं म्हणा – एखादं ध्येय असणं अन त्यापायी झपाटलेलं असणं छानच असतं पण त्या ध्येयाइतकीच प्रवासाचीही मजा घेता आली पाहिजे. जे खरेखुरे निसर्गप्रेमी असतात त्यांनाही वाघ दिसण्याचा तेव्हढाच आनंद होतो आणि तो बघण्यासाठी तेही आटापिटा करतात पण हे करताना ते जंगलातल्या नवीन वाटा शोधतात – एखादा नवीन पक्षी दिसला तर त्याचं निरीक्षण करतात – अगदीच ओळखता आला नाही तर त्याचा एखादा फोटो वगैरे काढून टिपण करतात आणि मग घरी गेल्यावर दुसऱ्यांशी चर्चा करून किंवा सलीम अलींच्या पुस्तकातला त्या पक्षाचा फोटो बघून हरखून जातात – वाघ दिसल्यासारखीच!
मला वाटतं आपलं आयुष्यही असच आहे – एखाद्या जंगल-सफारी सारखं – एखादं मोठं घ्येय जरूर असावं पण ते मिळणं – न- मिळणं हे आपल्या कर्तृत्वाचा नसून कधी कधी नशीबाचाही भाग असतो ही जाणीव ठेवावी. मला इथे सर एडमंड हिलरींची गोष्ट आठवते – ते जेव्हा माउंट एव्हरेस्टवर शेर्पा तेनसिंगबरोबर पोहोचले तेव्हा त्यांना जाणीव होती की तिकडे अगदीच थोडा वेळ वर थांबता येणार होतं मग त्यांनी पटकन तेनसिंगचा फोटो काढला – जगविख्यात अशा त्या पराक्रमाच्या घटनेच्यावेळी स्वतःचा फोटोच काढला नाही कारण कदाचित तो क्षण आणि तो प्रवास ते स्वतःसाठी जगले – दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही. एखाद्या ध्येयाची आपल्याला ओढ असेल तर त्या ध्येयाचा मार्गही आपण जगतो – मैलोनमैल आणि कित्येक दिवस पायपीट केलेला वारकरी पांडुरंगाच्या देवळाच्या नुसत्या कळसाच्या दर्शनानेही धन्य होतो – त्याचे डोळे पाणावतात – ते तीर्थ जगात कदाचित सर्वात पवित्र असतं !!
सुंदर स्फुट ! जंगलात वाघाचे राज्य असतं, त्याचा मूड असेल तरच तो दर्शन देतो. मी अनुभवलय ताडोबाच्या जंगलात ३ दिवस भटकंती करून माग काढता काढता नाकी नऊ आले अन् अगदी शेवटच्या फेरीला अगदी समोर दत्त म्हणून उभा राहिला आणि मी भव विसरून क्लिकक्लिकाट केला बांबूच्याबनात नाहिसा होई पर्यंत. ते दर्शन म्हणजे जणू निसर्गाविष्काराचा साक्षात्कारच होता. पण ते दर्शन होईपर्यंत रानाशी जवळीक आणि त्यातल्या अद्भूत सौंदर्याची अनुभूती मात्र झाली होती.
LikeLike
So well said Umesh! Could visualise it!
LikeLike
योगेश, अतिशय सुंदर लेख .
इतक्यातच आम्ही पण रणथम्बोर च्या व्याघ्र सफारी मध्ये हाच अनुभव घेतला. काही मंडळी इतकी बेचैन झाली की त्यांनी टूर मॅनेजर कडून आधीच्या ट्रिप मध्ये त्यांनी काढलेले फोटो कॉपी करून घेतले, इतरांना दाखवायला की आम्ही अपयशी झालो नाही. रियल लाईफ मध्ये पण असाच अनुभव येतो जिथे लोकं अपयश सहज स्वीकारताना दिसत नाहीत तर आपण कसे बरोबर होतो हेच दाखवायचा प्रयत्न करतात. तू दिलेले वारकऱ्यांचे उदाहरण अतिशय समर्पक आहे, कळसाचे दर्शन होऊन पण ते प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन केल्या इतकेच समाधानी असतात कारण यात्रेत प्रत्येक क्षणी ते विठ्ठल अनुभवतात.
LikeLike
तू म्हणतोस ते तंतोतंत पटलं आशिष
LikeLike
योगेशने भटक्यांंच्या भावनांना योग्य शब्दरुप दिले आहेस.
LikeLike
धन्यवाद 🙏
LikeLike
खूप छान, योगेश!
LikeLike
Thank you so much 😊
LikeLike